

बेळगाव : सरकारी शाळांपाठोपाठ आता अनुदानित शाळांनाही निरंतर ॲप सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन भरावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे तीन अँगलने फोटो काढण्याची सूचना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. सरकारी शाळांतून ही प्रक्रिया गत एक महिन्यापासून सुरू झाली आहे.
हलगा येथे जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ बैठकीच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन व्हावी, यासाठी निरंतर ॲप सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ सरकारी शाळांसाठी हे ॲप देण्यात आले होते. मात्र आता याचा विस्तार शिक्षण खात्याने अनुदानित शाळांनाही ॲप सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतील हजेरी ऑनलाईन होणार आहे.
हलगा येथील भरतेश नरसिंग कॉलेजमध्ये बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिक्षकांना इंटरनेट सुविधेसह ऑनलाईन मोबाईल ॲपविषयीची प्राथमिक माहिती देण्यात आली. कार्यशाळेला जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी
शाळेत किती विद्यार्थी हजर होते, ही माहिती शिक्षण खात्याला नियमितपणे मिळते. त्यानुसार माध्यान्ह आहार पुरवठा केला जातो. गैरहजर विद्यार्थी दाखवून माध्यान्ह आहार किंवा पैसे उकळण्याचा गोंधळ दूर झाला आहे. त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. शाळेत कर्तव्य ॲपमुळे शिक्षकांची हजेरी शंभर टक्के होत आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकाराना आळा बसला आहे. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांचीही हजेरी ऑनलाईन नोंदवण्याची सक्ती करण्यात आली आहे.