KPSC Exam : केपीएससी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन; ३४ केंद्रांत १२,४३३ उमेदवार देणार परीक्षा
KPSC Exam : केपीएससी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज
Published on: 
Updated on: 

बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगाद्वारे (केपीएससी) रविवारी (दि. १५) गॅझेटेड प्रोबेशनर्स भरतीची पूर्वपरीक्षा पूर्णपणे पारदर्शकपणे आणि कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी (दि. १२) दिली.

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल सिग्‍नल जॅमर्स बसवण्यासह सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सतत देखरेखीखाली असेल. परीक्षेसाठी ३४ केंद्रे असून १२,४३३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये दोन पर्यवेक्षक तैनात केले जातील. याव्यतिरिक्त, परीक्षा संपल्यानंतर लगेच ओएमआर उत्तरपत्रिका स्कॅन करण्याची प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

ओएमआर उत्तरपत्रिकांवर न सोडवलेल्या प्रश्नांना चिन्हांकित करण्यासाठी पाचवे वर्तुळ देण्यात आले आहे. उमेदवारांना याबद्दल कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक माहिती दिली जाईल. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.