

बेळगाव : राज्योत्सव दिनी आततायीपणा करत कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत पोलीस खात्याने अनेक मराठी फलक काढले व काही झाकण्यास सांगितले. हा तर भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचा भंग असून अशा कन्नड संघटनांना आणि पोलीस खात्यालाही आवरा. व्यापाऱ्यांनी व खासगी कार्यालयांवर लावलेले फलक हटविण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न करत संबंधितावर कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला.
राज्योत्सव दिनी १ नोव्हेंबररोजी जल्लोषाच्या नावाखाली कन्नड संघटनांनी धुडगूस घातला. यात यंदा भरीस भर म्हणजे अनेक ठिकाणचे फलक झाकण्याचे व काही काढून टाकण्याची सूचना पोलीस खात्याने केली. महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी भाषिकांसाठी काम करणारी सामाजिक संघटना आहे. रामलिंग खिंड गल्लीत गेल्या अनेक दशकांपासून समितीचे कार्यालय आहे. परंतु, खडेबाजार पोलीस हा फलक काढा म्हणून आपल्याला फोन करतात, अशी तक्रार समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केली. मराठी भाषिकांचा मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा प्रश्र्न त्यांनी केला.
मिरवणुकीच्यावेळी सन्मान हॉटेलजवळील शिवसेना रिक्षाथांबा, कॉलेज रोड, बाजारपेठेत अनेक मराठी व्यापारी असून त्यांनी मराठी व इंग्रजी फलक लावलेले आहेत. ते झाकून ठेवण्यास सांगितले जाते. न झाकल्याने जबरदस्तीने झाकायला लावले जातात, हा कुठला न्याय आहे? यातून भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. असे करून कन्नड संघटना कायदा हातात घेत आहेत. आस्थापनांवरील मराठी भाषेतील फलक जबरदस्तीने हटवणे व झाकायला भाग पाडणे, असा प्रकार सुरूआहे. अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाईकरावी. अन्यथा आम्ही मोर्चा काढून याबाबत जाब विचारू, असा इशारा मए समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना दिली असूनराज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी मध्यवर्ती म.ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष व माजी आ. मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, ॲड. अमर येळ्ळूरकर, नेताजी जाधव, विकास कलघटगी, अंकुश केसरकर, ॲड. एम. जी. पाटील, दत्ता उघाडे, लक्ष्मण होनगेकर, महेश जुवेकर, सुनील बाळेकुंद्री यांच्यासह समितीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.