

निपाणी : भरधाव कारची दुभाजकाला धडक बसल्यानंतर इंधन टाकीचा स्फोट होऊन कारला भीषण आग लागली. त्यात होरपळून हावेरी जिल्हा लोकायुक्त विभागाचे सीपीआय षडाक्षरी सालीमठ (वय 47) यांचा होरपळून मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री धारवाड-गदग सीमेवर हुबळी-कोप्पळ मार्गावर हा अपघात घडला. शनिवारी असलेल्या न्यायालयीन कामासाठी सालीमठ हावेरीहून बेळगावला येत होते. मात्र वाटेतच हा अपघात घडला. घटनेची नोंद अण्णिगेरी (जि. धारवाड) पोलिस ठाण्यात झाली आहे. सालीमठ यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सालीमठ हे मूळचे मुरगोड (ता. सौंदत्ती) येथील, ते हावेरी लोकायुक्त विभागात सेवेत होते. शुक्रवारी रात्री हावेरीहून निघाले होते. शनिवारी बेळगाव न्यायालयात त्यांचे काम होते. त्यांची कार हुबळी-कोप्पळ मार्गावरून अण्णिगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आली असता, कारची दुभाजकला धडक बसून कार घसरत जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला रस्त्याबाहेर गेली. पण त्याचवेळी कारच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन शॉर्टसर्किटमुळे कारने लागलीच पेट घेतला. त्या आगीत सालीमठ यांचा होरपळून मृत्यू झाला. कारने दुभाजकाला धडक देताच त्या आघाताने सालीमठ बेशुद्ध झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कारमधून बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीएसपी प्रभू किरदळे, मुळगुंदचे सीपीआय संगमेश शिवयोगी, अण्णिगेरीचे सीपीआय रवी कपतणावर, उपनिरीक्षक उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच घटनेत कार बेचिराख होऊन सालीमठ यांचा मृत्यू झाला होता.
सालीमठ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. सालीमठ हे मनमिळावू स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांची 22 वर्षे सेवा झाली होती. अपघाती मृत्यूमुुळे पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे. सालीमठ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुरगूड या मूळगावी शनिवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद, हावेरी जिल्ह्याचे लोकायुक्त पोलिस प्रमुख एम. कोल्हापुरे, डीएसपी मधुसुदन यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बेळगाव व हावेरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.