Belgaum financial scam: ३५ हजार ठेवीदारांची फसवणूक?

गुंतवणूक सल्लागार नीलन्नवर रडारवर : एफआयआर नोंदवणार
Fraud
Fraud
Published on
Updated on

बेळगाव : वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे चर्चेत आलेला गुंतवणूक सल्लागार तसेच सामाजिक कार्यकर्ता शिवानंद नीलन्नवर आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवत सुमारे ३५ हजार ठेवीदारांची शेकडो कोटींची रक्कम त्याने घेतली असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर एफआयआर करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत माळमारुती पोलिसांत सुरू होती. केपीआयडी तसेच बडस्‌ ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे.

बेळगाव शहर स्वच्छ करण्यासाठी लोकांना जमवत असल्याचे सांगत शहरभर पोस्टर्स आणि बॅनर्स लावणारा शिवानंद काही दिवसांपासून बेळगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. त्याची काही वादग्रस्त वक्तव्ये देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यातील एकामध्ये त्याने आपल्याकडे १५ हजार बंदुका असल्याचा दावा केला आहे.

अशाच प्रकारची अनेक वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या शिवानंद याच्या शिवबसवनगर येथील कार्यालयावर गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथे त्याने शिवम असोसिएटस्‌ नावाने कार्यालय थाटले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार केपीआयडी व बडस्‌ ॲक्टनुसार हा छापा टाकण्यात आला.

अनेक कागदपत्रे जप्त, पण गुप्तता

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुरुवारी सायंकाळी तसेच शुक्रवारी दिवसभर त्याच्या बेळगावातील दोन कार्यालयांची झडती घेण्यात आली. प्रांताधिकारी, महसूल अधिकारी व पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सापडलेली आहेत. यामध्ये नीलन्नवरने अनेकांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून रक्कम गुंतवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी करून एफआयआरची प्रक्रिया सुरू होती.

आज अधिकृत माहिती जाहीर?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवानंद नीलन्नवरच्या एकूण साम्राज्याबद्दल आज स्पष्टता होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व प्रांताधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माहिती दिली जाणार असून, शिवानंदच्या एकूण प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news