

बेळगाव : गोकाक तालुक्यातून बेळगावात येऊन अफू विकणाऱ्या वृद्धाला सीसीबी पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) सायंकाळी अटक केली. रफिकअहंमद हुसेनसाब शिकलगार (वय ६२, रा. नेसरगी रोड, अक्कतंगेरहाळ, ता. गोकाक) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन किलो अफू जप्त केले. याची किंमत ४४ हजार रुपये होते.
सदर संशयित वृद्ध गावाहून बेळगावात अफू विकण्यासाठी आल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. सदर वृद्ध शहरातील फोर्ट रोडवरील जुन्या केएसआरटीसीजवळील इंदिरा कँटीनजवळ थांबला असल्याचेही समजले.
नाईक यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता सदर वृद्धाकडे तब्बल दोन किलो ९८८ ग्रॅम अफू आढळून आला. त्याला अटक विचारणा केली असता त्याने अफू राजस्थानमधील जोर्ले येथील धीरुभाई याच्याकडून आणल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.