Belagavi Meat Record | बेळगावकरांनी फस्त केले 11 हजार किलो मटण!
बेळगाव : गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी ‘उंदरी’ करण्याची प्रथा असून, त्यानिमित्त यंदा बेळगावकरांनी सुमारे 11 हजार किलो मटणाची खरेदी केली. शिवाय मटणाच्या तुलनेत दुप्पट चिकनची खरेदी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बहुतेक बेळगावकरांनी गुरुवारी मांसाहारावर ताव मारल्याचे स्पष्ट आहे.
उंदरीनिमित्त सकाळपासून मटण खरेदी करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. शहरात एकूण 190 मटणविक्री दुकाने आहेत. एका दुकानात सरासरी 60 किलो मटणाची विक्री झाली. त्यानुसार 11 हजार 400 किलो मटणाची विक्री झाली असल्याची माहिती मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष उदय घोडके यांनी दिली. गुरुवारी मटण दुकानदारांनी सुमारे एक हजार बकरी आणली होती. शहरात मटणाचा दर प्रतिकिलो 740 रुपये तर चिकनचा दर 190 किलो होता.
श्रावण महिना संपल्यानंतर मटण विक्री सुरू झाली आहे. गुरुवारी शहरात 190 दुकानांतून सुमारे 11 हजार किलो मटणाची विक्री झाली. मटणाचा दर 740 रुपयेच ठेवण्यात आला होता.
उदय घोडके, अध्यक्ष, शहर मटण विक्रेता संघटना

