बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर या फलकाच्या खटल्यांच्या सुनावणीत सोमवारी (दि. २८) चौघांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक जुलै २०१४ मध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला. लोकांनी या प्रकाराला शांततेत विरोध केला. पण, मराठी जनतेला पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या २२२ जणांवर गुन्हे दाखल करून खटले भरण्यात आले. त्यापैकी खटला क्र. १२५/१५ आणि सदर खटल्यासंदर्भात आज १२२/१५ संदर्भात सोमवारी न्यायालयासमोर साक्षी नोंदविण्यात आल्या. खटला क्र.१२५/१५ मध्ये ४२ संशयित आहेत.
पीडीओ रणजितसिंग उदयसिंग राजपूत, पीडीओ गोपाळ होसकोटी आणि शिवानंद रुद्रस्वामी हिरेमठ यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्याचप्रमाणे खटला क्र. १२२/१५ मध्ये पीडीओ गोपाळ दुंडाप्पा होसकोटी यांची साक्ष नोंदविण्यात आली. या पद्धतीने आज एकूण चार खटल्यांपैकी दोन खटल्यांसंदर्भात साक्ष नोंदविण्यात आली.
न्यायालयामध्ये आज उपस्थित असलेल्या संबंधित खटल्यांच्या साक्षीदारांसह गेली ९ वर्षे लढा देणाऱ्या येळ्ळूरवासीयांची रमाकांत कॉडुसकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या वकीलवर्गाशी चर्चा केली. येळ्ळूर महाराष्ट्र फलकप्रकरणी २२२ लोकांपैकी १८५ लोकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या वतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बॅचण्णावर, अॅड. शाम पाटील, अॅड. महेश मोरे, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. विशाल चौगुले आदी काम पाहत आहेत.