बेळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहात तीन महिन्यांत तब्बल ४१ अर्भकांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण बिम्सला चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्याकडे खुलासा मागितला असून याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बिम्स प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील एअर कॉम्प्रेसर गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त झाला आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तीन महिन्यांत तब्बल ४१ अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी जिल्हा रुग्णालयाच्या आंधळ्या कारभाराबाबत टीकेची झोड उठवल्याने बिम्स प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केवळ एअर कॉम्प्रेसरमुळे बालकांचा मृत्यू झाला नसून त्याला वेगवेगळी कारणे कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण विम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. मात्र, आता ही बाव सरकारनेदेखील गांभीर्याने घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पण, त्यांनी याबाबत बिम्सच्या संचालकाना घडलेल्या घटनेबाबत खुलासा देण्याची सूचना केली आहे. तसेच याबाबत आरोग्यमंत्र्यांची देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकंदरीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (दि.२८) सकाळपासून विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. चौकशी पथक सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली असून बिम्स प्रशासनाभोवती आता चौकशीचा ससेमीरा लागणार आहे.