

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव काळा दिवस साजरा करू दिला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी (दि. ८) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत बोलताना दिला. महत्त्वाचे म्हणजे राज्योत्सव तयारीवर चर्चा सोडून कन्नड संघटनांनी काळा दिन आणि म. ए. समितीच्या नावाने शिमगाच केला.
ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाणार आहे. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाला कदापिही परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री आदी उपस्थित होते. यावेळी कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी अतिरंजित मागण्या केल्या, समितीच्या काळ्या दिनावर बंदी आणावी, राज्योत्सवात डीजे लावण्यास परवानगी द्यावी, प्रेक्षा गॅलरी उभारावी, हेलिकॉप्टरने चन्नम्मा यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात यावी, कन्नड नेत्यांना पुरस्कार देण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी रोशन यांनी जिल्हा क्रीडांगणावर मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये ध्वजवंदन, पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
अन्यायाविरोधात काळा दिन: माभागातील मराठी जनता १९५६ पासून काळादिन पाळत आली आहे. केंद्र सरकारच्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाववर झालेल्या अन्यायाविरोधात काळादिन पाळण्यात येतो. सकाळी मूक फेरी आणि त्यानंतर जाहीर सभा होत असते. त्यामुळे या फेरीला आजपर्यंत प्रशासनाने कधीही परवानगी दिली नव्हती. म. ए. समितीनेही कधी परवानगी मागितली नाही. प्रशासनाला मार्गाची माहिती देऊन फेरी काढण्यात येते. त्यामुळे यावेळीही तशाच प्रकारे फेरी निघणार आहे, अशी माहिती म. ए. समिती नेत्यांनी दिली आहे.