Belagavi Crime : महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल; तिघांना अटक

छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रण; 50 लाखांची मागणी
Belagavi Crime
Belagavi Crime : महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल; तिघांना अटक Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : एका सरकारी अधिकारी असलेल्या महिलेच्या घरी छुपा कॅमेरा लावून त्याद्वारे त्यांचे खासगी क्षणाचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर घालण्याच्या भीतीने 50 लाखांची मागणी केली. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांना माळमारुती पोलिसांनी अटक केली. हे तिघे यू-ट्यूब चॅनेल चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

समीर निसारअहमद शेख (वय 32, रा. जलाल गल्ली, गोकाक), अब्दुलरशीद नजीरअहमद मकानदार (51, रा. योगीकोळ्ळ, ता. गोकाक) व महंमददिलावर नजीरअहमद बाळेकुंद्री (43, रा. घटप्रभा, ता. गोकाक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, उपरोक्त तिघा संशयितांनी सदर सरकारी महिला अधिकाऱ्याच्या घरी असलेल्या बल्बच्या होल्डरमध्ये छुपा कॅमेरा लपवला होता. याद्वारे त्या महिलेच्या घरातील खासगी क्षण या कॅमेऱ्यात कैद झाले होते. याच व्हिडीओचा आधार घेऊन हे तिघे सदर महिलेला धमकी देत होते. सदर व्हिडीओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतो व चॅनेलना देतो, असे धमकावत होते. जर हे नको असेल तर 50 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली होती. याप्रकरणी या महिलेने माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली होती. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताअंतर्गत तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. याचा तपास करत तिघा संशयितांना बुधवारी सायंकाळी अटक केली.

कारसह साहित्य जप्त

सदर संशयितांकडून चार मोबाईल, पेनड्राईव्ह, सहा छुपे कॅमेरे लपवलेले सहा बल्ब होल्डर, मेमरी कार्डस्‌‍, रिडर यासह कार (केए-49 एन-8055) जप्त केली आहे. प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी डॉ. भानुप्रकाश, माळमारुतीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उदय पाटील, पी. एम. मोहिते यांनी ही कारवाई केली. या कारवाईत अरुण कांबळे, सी. आय. चिगरी, मारुती कुरेर, के. बी. गौराणी, संदीप नडुगेरी, गोपाळ लट्टी, मंजुनाथ माळेद, महेश वडेयर, हणमंत दोड्डुगोळ, शिवानंद हुक्केरी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद यांनी भाग घेतला.

यु-ट्युब चॅनेलचे पत्रकार?

अटक केलेले तिघे संशयित आपण पत्रकार असल्याचे पोलिसांना सांगत होते. परंतु, पोलिसांनी ते पत्रकार असल्याचा उल्लेख केलेला नाही. त्यांची चौकशी केली असता ते यु-ट्युब चॅनेल चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी या महिलेच्या घरात छुपा कॅमेरा कसा लपवला, त्यानंतर तो काढून कसा आणला, याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news