

बेळगाव : आपल्या भावाला पैसे देण्याचा तगादा लावल्याने संताप अनावर झालेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. बंगळूरमधील पीन्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागसंद्र गावात शुक्रवारी (दि. 3) ही घटना घडली. काव्या (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहेत. तर करिअप्पा असे संशयित पतीचे नाव असून दोघेही मूळचे बेळगावचे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काव्या व पती करिअप्पा हे बंगळूरजवळील नागसंद्रमध्ये राहतात. या दांपत्याला दोन मुले आहेत. करिअप्पा बंगळरमध्ये कंत्राटदार म्हणून काम करतो. गेल्या आठवड्यापासून दोघांमध्ये पैसे आणि मालमत्तेच्या मुद्यांवरुन सतत वाद होत होते. गुरुवारी (दि. 2) करिअप्पा आपल्या कामातून दोन लाख रुपये घरी घेऊन आला होता. या पैशांवर डोळा असलेल्या पत्नी काव्याने ते पैसे भावाला देण्याची मागणी केली. यावरुन तिने पतीशी जोरदार वाद घातला.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास याच मुद्यावरुन दोघांचे भांडण सुरु झाले. भांडण वाढल्यावर संतापलेल्या करिअप्पाने पत्नी काव्यावर हल्ला केला. जमिनीवर पडलेल्या काव्याच्या मानेवर त्याने पाय ठेवला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या करिअप्पाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी पीन्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.