

बेळगाव : एकटी राहणाऱ्या महिलेचा तिच्याच घरात मृत्यू झाल्याची घटना तब्बल तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली आहे. दीड वर्षे त्या महिलेचे काय झाले, याबाबतची माहिती नातेवाईक वा शेजाऱ्यांना नव्हती, याचेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मूळच्या बेळगावच्या व गेल्या १५ वर्षांपासून बंगळुरात वास्तव्यास असणाऱ्या यू. द्राक्षायिनी (वय ५२) या महिलेची अशी शोकांतिका झाली आहे.
वायव्य बंगळूर भागातील बागलकुंटे येथील हावनूर लेआउटमधील एका ५२ वर्षीय महिलेचा सांगाडा शहर पोलिसांनी तिच्या राहत्या घराच्या बाथरुममधून ताब्यात घेतला आहे. तिचा मृत्यू सुमारे १८ महिन्यांपूर्वी झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बाबात मिळालेली अधिक माहिती अशी, मूळच्या बेळगावच्या असलेल्या मृत द्राक्षायिनी व तिचे पती उमेश वाय. यांच्यासमवेत गेल्या १५ वर्षांपासून हावनूर लेआउटमधील दुमजली घरात राहत होत्या. त्यांचे पती आणि मुलगा काही वर्षांपूर्वी मरण पावले आहेत. तर त्यांची मुलगी घरापासून सुमारे ४ किमी अंतरावर असणाऱ्या बागलकुंटेजवळ राहते. मुलीचे लग्न द्राक्षायिनीचा धाकटा भाऊ महेश याच्याशी झाले आहे. त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे, असे सांगण्यात आले.
द्राक्षायिनीच्या शेजाऱ्यांनी घर बरेच दिवस बंद असल्याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) रात्री दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममध्ये द्राक्षायिनी यांचा सांगाडा आढळला. हातात सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यात सोन साखळी आढळून आली. त्याचबरोबर चांदीचे दागिनेही जशास तसे अवस्थेत होते. त्यामुळे, दरोडा किंवा चोरीची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. घराचा मुख्य दरवाजा आणि बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता, यावरुन असे दिसून येते की मृत्यूच्या वेळी द्राक्षायिनी घरात एकट्याच होत्या.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, द्राक्षायिनी आपल्या मुलीसह नातेवाईकांपासून अंतर ठेवून होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात कोणताही संपर्क झाला नव्हता. द्राक्षायिनी उत्तर भारतासह विविध ठिकाणी वारंवार तीर्थयात्रेला जात असत. ती अशाच एखाद्या तीर्थयात्रेला गेली असेल असा नातेवाईकांचा समज झाला होता. त्यामुळे, त्यांच्या मुलीने आणि इतरांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. जावई महेशने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.