

बेळगाव : बीपीएल रेशनकार्डधारकांना मे आणि जून महिन्यांचे धान्य वितरण सुरु आहे. यंदा धान्य टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. धान्य साठवण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे कारण देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या वाट्याचे मे आणि जून महिन्यांचे धान्य वितरण मे महिन्यातच करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या वाट्याचे दोन्ही महिन्यांचे धान्य जून महिन्यात वितरण करण्यात येणार आहे.
मे आणि जून महिन्याचे केंद्र सरकारचे माणसी ५ किलोप्रमाणे दोन महिन्याचे मिळून माणसी १० किलो तांदळाचे वितरण केले जात आहे. या महिन्यात केंद्र सरकार रेशन वितरण करत असल्याने राज्य सरकार पुढील महिन्यात रेशन वितरण करणार आहे.
लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात होणार नसून, ते दोन टप्प्यांत मिळणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गोडावूनमधील धान्यसाठा मर्यादित असल्याने वितरण व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. वितरण प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, तसेच सर्व लाभार्थ्यांपर्यंत धान्य वेळेत पोहोचावे, यासाठी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, काही भागांत लाभार्थ्यांमध्ये सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण होते; मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक रेशनकार्डधारकांना दोन्ही महिन्यांचे पूर्ण धान्य मिळणार असून कोणतीही तूट होणार नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता नियोजित वेळापत्रकानुसार धान्य स्वीकारावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.