belgaon | भक्‍तांच्या दानावर सीसीटीव्हीची नजर

जिल्ह्यातील ३,८०६ मंदिरांची सुरक्षा होणार कडक : डिजिटल देणग्या देण्याचे आवाहन
belgaon | भक्‍तांच्या दानावर सीसीटीव्हीची नजर
Published on
Updated on

बेळगाव : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीमुळे राज्य सरकार सावध झाले असून आता जिल्ह्यात धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमधील दानपेटी, मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि डिजिटल देणग्यांची सुरक्षा पारदर्शकता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मादाय खात्याकडे जिल्ह्यात ३,८०६ मंदिरे आहेत; यामध्ये अ श्रेणीतील ५, ब श्रेणीतील ६ आणि क श्रेणीतील ३,७९५ मंदिरांचा समावेश आहे. या कार्यप्रणालीचा एक भाग म्हणून, मंदिर प्रशासनाला दान पेट्या सुरक्षित आणि स्पष्टपणे दिसणाऱ्या ठिकाणी बसवण्याचे तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दानपेटीसाठी चारही बाजूंनी लक्ष ठेवणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा अनिवार्य केली जाईल. ही दृश्ये मध्यवर्ती सर्व्हरवर साठवली जातील आणि त्यावर धर्मादाय खाते, जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून देखरेख ठेवली जाईल. चोरी रोखण्यासाठी आणि पाळत ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी दान मोजणी केंद्रे आणि मंदिर परिसरातील संवेदनशील ठिकाणीही कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. कॅशलेस देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व मंदिरांमध्ये सुरक्षित यूपीआय, भीम आणि क्यूआर कोड पेमेंट सुविधा सुरु केल्या जातील. या क्यूआर कोड्सवर बँकेचे अधिकृत तपशील असतील आणि ते केवळ अधिकृत दान पेट्यांवळच लावले जातील. फसवणूक करणाऱ्यांनी मूळ क्यूआर कोड बदलून त्याजागी बनावट कोड लावू नयेत, यासाठी मंदिर प्रशासनाला या कोड्सची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहार यशस्वी झाल्याची पुष्टी करणारी ऑडिओ अनाउन्समेंट यंत्रणाही बसवली जाईल.

मोठ्या प्रमाणात देणगी मिळणाऱ्या मंदिरांमध्ये दानपेटीतील रकमेची मोजणी दर आठवड्याला तर इतर मंदिरांमध्ये दर दोन आठवड्यांनी केली जावी. ही प्रक्रिया तहसीलदारांच्या देखरेखीखाली आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनिवार्य उपस्थितीत पार पडेल. देणगीतून प्राप्त झालेले सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचे मूल्यमापन त्याच दिवशी करुन ते जिल्हा उप-कोषागारात जमा करणे आवश्यक आहे.

दान मोजणीही अद्ययावत

दान मोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी फेस रेकग्निशन (चेहरा ओळखण्याचे) तंत्रज्ञान वापरले जाईल. तसेच, पेटी उघडण्यापासून ते बँकेत रोख रक्कम जमा करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे तारीख आणि वेळेसह चित्रीकरण केले जाईल. दानपेटी मोजणीच्या कामात केवळ होम गार्ड्स, बँकेचे कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल.

अ श्रेणीतील मंदिरे

रेणुका यल्लम्मा मंदिर, यल्लम्मा (सौंदत्ती)

वीरभद्रेश्वर मंदिर, गोडची (रामदुर्ग)

दत्त मंदिर, पंत बाळेकुंद्री (बेळगाव)

परमार्थ निकेतन हरी मंदिर, अनगोळ (बेळगाव)

महाकाली मायाक्का देवी मंदिर, चिंचली (रायबाग)

ब श्रेणीतील मंदिरे

साई मंदिर, टिळकवाडी (बेळगाव)

वीरभद्रेश्वर स्वामी मंदिर, वीरभद्र नगर (बेळगाव)

कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर गल्ली (बेळगाव)

समादेवी मंदिर, समादेवी गल्ली (बेळगाव)

होळेम्मा (लक्ष्मी) मंदिर, बडकुंद्री (हुक्केरी)

मार्तंड मल्लय्या मंदिर, मंगसुळी (कागवाड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news