

बेळगाव : उन्हाळा ऐन मध्यावर आला असल्यामुळे रविवारी (दि. 12) बेळगावचे तापमान 38 अंशांवर पोचले. त्यामुळे, साप्ताहिक सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने हॉट संडे ठरला आहे. गेल्या सात दिवसांत कमाल तापमानात पाच तर किमान तापमानात आठ अंशांनी वाढ झाली आहे.
बेळगावात एप्रिल महिन्यात सरासरी तापमान 34 ते 36 अंश असते. पण, यंदा हे तापमान 38 अंशांवर पोचले आहे. त्यामुळे, लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारच्या वेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतोय. शेतीकामांवरही परिणाम झाला आहे. उष्णतेपासून बचावासाठी शीतगृहे व रसवंतीगृहांत गर्दी होताना दिसतेय. शीतपेयांना मागणी वाढली आहे. कमाल तापमान 24 अंशांवर आहे. या तापमानातही घट होत नसल्यामुळे उष्णतेचा प्रभाव दिवसरात्र जाणवत आहे. त्यामुळे, घरोघरी पंखे, वातानुकुलित यंत्रे दिवसभर सुरु आहेत. आगामी काळातही तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमाल तापमान गेल्या सात दिवसांत पाच तर किमान तापमानात आठ अंशांनी वाढ झाली आहे. अचानक तापमानात वाढ झाल्याने अंगातून घामाच्या थारा वाहू लागल्या आहेत. उकाडा असह्य होत चालला आहे. उन्हाळ्यामुळे शहरात आणि परिसरात उसाचा, फळांच्या रस विक्रीत वाढ झाली आहे. शहाळ्यांचे दर वाढले आहेत. याशिवाय ताक, सोलकडी, आंबिल अशा पेयांनाही मागणी वाढली आहे. तापमानात वाढ झाल्याचा परिणाम शरीरावर होत असून डोकेदुखी, डोळेदुखी, चक्कर येणे, ताप अशा आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे रुग्णालयांत गर्दी होत आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी वारंवार पाणी प्यावे, प्रखर उन्हात बाहेर पडू नये, सैल आणि सुती कपडे वापरावेत, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.