

बेळगाव : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला असून जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. आठ दिवसांपासून तापमानात घट होत असून शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे तापमान 8 अंशांवर घसरले. थंडीमुळे हुडहुडी भरली असून पुढील काही दिवस थंडीची लाट असणार आहे. रात्री आणि पहाटे शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. डिसेंबर महिना सुरू होताच जिल्ह्यात कडाक्याची थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस गारठा वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ग्रामीण भागामध्ये पहाटे दाट धुके पडत आहेत. काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे. यंदा पहाटेच्या वेळी आणि सायंकाळनंतर थंडीचा जोर कमालीचा वाढलेला दिसत आहे.
थंडीमुळे गरम कपड्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे बाजारपेठेत गरम कपड्यांची मागणी वाढली आहे. शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळविताना दिसत आहेत. या थंडीमुळे चहा टपरीवरही गर्दी वाढत आहे. लहान मुलांसाठी आणि वृद्धासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.