

बेळगाव : ग्रामपंचायत सभागृहाची मुदत संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 24 एप्रिलपर्यंत आक्षेप दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 497 ग्रामपंचायतींसाठी 8,413 इतकी सदस्यसंख्या जाहीर केली आहे.
कर्नाटक पंचायतराज मतदारसंघ फेररचना आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील सदस्यांची संख्या निश्चित करून यादी जाहीर केली आहे. याबाबत आक्षेप असल्यास नागरिकांनी ते ऑनलाईन अथवा पोस्टाने 24 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन केले आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी कर्नाटक पंचायतराज सीमा निर्णय आयोग, तिसरे गेट, दुसरा मजला, खोली क्रमांक 222/ए, अपार्टमेंट, आंबेडकर रोड बंगळूर : 560001 किंवा ऑनलाईन पद्धतीने https://rdpr.karnataka.gov.in/rdc/public/ या वेबसाईटवर आक्षेप दाखल करावेत.
बेळगाव तालुक्यात सर्वाधिक सदस्य
नव्याने निश्चित करण्यात आलेल्या संख्येनुसार जिल्ह्यात बेळगाव तालुक्यात सर्वाधिक सदस्य आहेत. तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींमध्ये 951 सदस्य आहेत. त्याखालोखाल हुक्केरी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींसाठी 880, अथणी तालुक्यात 46 ग्रामपंचायतींसाठी 832 सदस्यांची संख्या निश्चित केली आहे.