

बेळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन महापालिकेने बेळगावला मोकाट कुत्रीमुक्त शहर बनवण्याचा निर्धार केला आहे. त्याअंतर्गत शनिवारपासून मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन स्ट्रीट डॉग’ असे नाव मोहिमेला देण्यात आले आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध, लहान मुले आणि महिला जखमी झाल्या आहेत. नागरिकांनी महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. त्याची दखल घेत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मनपा कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेट्टी गल्ली परिसरातून हिंसक कुत्र्यांना पकडले. मोहिमेदरम्यान सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले आणि स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. येत्या काही दिवसांत शहर व उपनगरात टप्प्याटप्प्याने ऑपरेशन स्ट्रीट डॉगअंतर्गत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
निर्बीजीकरण कध़ी?
मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि शस्त्रक्रिया यांसारख्या दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी मागणी बेळगाव शहरवासी करत आहेत.