

बेळगाव : संकेश्वरमधील खूनप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. संशियतांपैकी एकाच्या पत्नीसोबत असलेला अनैतिक संबंधाचा संशय, पायवाटेचा वाद आणि मृताने निवडणुकीत विरोधात केलेले काम आदी कारणांमुळे हा खून झाल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी (दि. २२) पत्रकारांना सांगितले. बाबू शंकर भोसगोळ (वय ३२, रा. गोरक्षणमाळ, जनता प्लॉट, संकेश्वर) असे मृताचे नाव आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये सुब्बराव ऊर्फ शुभम आनंद बिसुरे (वय ३५, बिरेश्वरनगर, संकेश्वर), अक्षय बाबासाहेब मरडी (वय ३७), पवन श्रीधर मरडी (२३), अनिल बाळासाहेब मरडी (वय २२), संदीप आप्पासाहेब मरडी (वय ३२, सर्वजण रा. भीमनगर, संकेश्वर) व अभिषेक बसवराज अलदाळे (वय २३, रा. आदर्शनगर, संकेश्वर) यांचा समावेश आहे.
पोलिसप्रमुख रामराजन म्हणाले, पहिला संशयित सुब्बराव याच्या पत्नीशी मृत बाबू याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुब्बराव याला होता. याशिवाय मरडी व भोसगोळ कुटुंबीय आजूबाजूला राहात असल्याने त्यांच्यात गल्लीतील पायवाटेवरुनही वाद होता. गेल्या नगरपालिका निवडणुकीचा रागही संशयितांना होता. कारण बाबूने मरडी कुटुंबाच्याविरोधात काम केले होते. याचाही राग हल्लेखोरांनी काढला.
शनिवारी (दि. २०) मध्यरात्री एकच्या सुमारास बाबू त्याच्या स्कुटीवरुन जात असताना त्याला रस्त्यात अडविण्यात आले. त्यानंतर विळा व लोखंडी रॉडने हल्ला करुन त्याचा खून केला. संकेश्वरचे पोलिस निरीक्षक गणपती कोंगनोळ्ळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खुनाचा तपास लावल्याचे त्यांनी सांगितले.