

बेळगाव : कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुधारणा, क्रीडा विकास आणि स्वच्छता अभियानासह अर्बन चॅलेंज फंड योजनेअंतर्गत सुमारे १४.६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
प्रकल्पांसाठी निधी उभारणीचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकूण खर्चापैकी २५ टक्के (३.६५ कोटी) केंद्र शासनाकडून अनुदान रुपात मिळणार असूत तेवढाच २५ टक्के निधी कॅन्टोन्मेंट बोर्ड उभारणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी बँक कर्ज किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
१४.६० कोटी रुपये कोटींच्या प्रकल्पात सर्व्हे क्र. २९९-बी येथे लॉजिंग सुविधेसह व्यापारी संकुल उभारणे, कोटे तलाव परिसर आणि हेड पोस्ट ऑफिस रस्त्याजवळ फूड कोर्टची निर्मिती, होंडा शोरूमच्या समोर शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करणे, विद्यमान कम्युनिटी हॉलजवळ खुले नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सभागृह बांधणे. विविध प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यात आले आहे. यात बिवूर रोड, कॅटल रोड, हाय स्ट्रीट मार्गाचा समावेश आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बसण्याचे बाक, प्रयोगशाळा अद्ययावतीकरण, स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी ६ लाख रुपये खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर व डिस्प्ले स्क्रीन बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट परिसराला कचरामुक्त शहरांच्या रँकिंगमध्ये '७-स्टार रेटिंग' मिळवून देण्यासाठी ४६ लाख रुपये खर्चातून संपूर्ण क्षेत्रात ५८३ कचराकुंड्या बसवल्या जातील तसेच कचरा संकलनासाठी ३ नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत.
सीएसआर निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. खासदार जगदीश शेट्टर यांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय सीएसआर निधीच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटच्या प्रमुख भिंतींवर सामाजिक संदेश देणारी चित्रे काढून सुशोभीकरण केले जाणार आहे.