

बेळगाव : बेळगावचा पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप व हिडकल जलाशयातील पाणी पातळीत सातत्याने घट होत आहे. राकसकोप जलाशयात तर गतवर्षीपेक्षा दोन फूट कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे, भविष्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिंता भेडसावत आहे. आतापासूनच पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका, पाणीपुरवठा मंडळ व एल अँड टी कंपनीने केले आहे.
सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपातळीत अशीच घट होत राहिली, तर भविष्यात हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. शहरवासीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिका, कर्नाटक शहर पायाभूत सुविधा विकास आणि वित्त महामंडळ तसेच एल अँड टी कंपनीकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. २ मेरोजी गतवर्षी राकसकोप जलाशयाची पातळी २,४५७.५५ फूट होती.
यंदा याच दिवशी पातळी २,४५५.८५ फुटांवर आली आहे. गतवर्षीपेक्षा पाणी साठा दोन फुटांनी कमी आहे. शहराला रोज ११६ एमएलडी पाण्याची गरज भासते. शहरात एकूण १९ मोठ्या व १३ लहान विहिरी आहेत. त्यांनी अजून तळ गाठलेला नाही. या विहिरी व कूपनलिकांवर पंप बसवून त्या पाण्याचा पुरवठा स्थानिक रहिवाशांना केला जात आहे. या माध्यमातून १,५६,००० हजार लोकांना पाणी पुरविले जाते.
टँकरला मागणी वाढली
पाणी टंचाईच्या झळा फेब्रुवारीपासूनच बसू लागल्याने शहरात टँकरने पाणीपुरवठा वाढला आहे. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. शहरात रोज २८ टँकर पाणी पुरवत आहेत. शहरात हॉटेल व्यावसायिक, बांधकाम साईटवर पाण्याची गरज भासते. त्यामुळे टँकरना मागणी वाढली आहे.