

बेळगाव : आरपीडी महाविद्यालय परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांवर हल्ला करून जखमी केले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून महापालिकेच्या पथकाने त्या कुत्र्याला पकडून त्याचा बंदोबस्त केला.
शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनत असतानाच आता पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोकादेखील वाढला आहे. आरपीडी महाविद्यालय परिसरातील घटनेनंतर लोकांनी तातडीने महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रार मिळताच महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी राजू संकण्णावर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून सुरक्षितरित्या हलविण्यात आले. त्यानंतर त्या कुत्र्याला पुढील निरीक्षणासाठी हिरेबागेवाडी येथील केंद्रात ठेवण्यात आले.
पिसाळलेला कुत्रा काही दिवसांपासून आक्रमक व संशयास्पद हालचाली करत होता. अचानक लोकांच्या अंगावर धावून जाणे, विनाकारण भुंकणे आणि चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. लोकांनी महापालिकेकडे मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तसेच रेबीजग्रस्त संशयित कुत्र्यांबाबत तातडीने आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.