

बेळगाव : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (दि. 15) सुरुवात होणार आहे. यावेळी उत्तर कर्नाटकातील समस्या आणि बेळगाव जिल्ह्याचे विभाजन या विषयावर राज्य सरकार ठोस ग्वाही देणार की, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा वाद तसाच पुढे सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार, अशी घोषणा झाल्यापासून राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात खुर्चाचा वाद रंगू लागला होता. या विषयावर दिल्लीतील हायकमांडने सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला असला, तरी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून परस्परविरोधी वक्तव्ये करण्यात येत आहेत.
त्यामुळे विधिवेशन काळातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पुत्र डॉ. यतींद्र यांनी सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असणार आहेत, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या समर्थक आमदार, मंत्र्यांना न्याहारीचे आयोजन करून त्याठिकाणी बैठक घेतील. त्यावेळी आठ मंत्र्यांसह इतर आमदारही उपस्थित होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्या समर्थकांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. त्यामध्ये पाच मंत्री आणि सुमारे चाळीस आमदार उपस्थित राहिले होते. त्यामुळे या विषयावरून आता राजकारण तापले आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी या बैठकांत विशेष काही झाले नाही, असा दावा केला असला तरी राजकारण मात्र जोरात सुरू आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ देण्यात आला. या काळात गृहलक्ष्मी योजनेतील रखडलेला दोन महिन्यांचा निधी वगळता विरोधकांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यासाठी काही गवसले नाही. पण, आता दुसऱ्या आठवड्यात विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकाच्या चर्चेवर मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत. त्यांच्या निवेदनावरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान जिल्ह्यातील काही घटनांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात विधिमंडळात जोरदार घडामोडी घडणार आहेत.