

बेळगाव : पंधरा दिवसांपूर्वी अनगोळमधील मारुती गल्लीत झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक करुन त्यांच्याकडून १६ लाख ५७ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
उज्ज्वला रवी कम्मार (वय ४०, मूळ रा. मालवनहळ्ळी, जि. चित्रदूर्ग, सध्या रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी) व शिवा शंकर अप्पय्यण्णावर (वय ३०, मूळ रा. मदनभावी, ता. बैलहोंगल, सध्या रा. लक्ष्मीनगर, गणेशपूर) अशी संशयितांची नावे आहेत.
अनगोळमधील मारती गल्लीत १५ एप्रिल रोजी घरफोडीची घटना घडली होती. त्या आधारे टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून याचा शोध सुरू होता. त्यांनी संशयावरून उपरोक्त दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून गंठण, अंगठ्या व अन्य दागिने असा तब्बल १११ ग्रॅमचे १६ लाख ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. निरीक्षक पुजेरी यांच्यासह उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.