

बेळगाव : पोलीस रेकॉर्डवर एमओबी फाईल असलेल्या कुख्यात गुंडाने दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संजू ऊर्फ संज्या मल्लाप्पा मेकळी (वय 25, रा. बेनकनहोळी ता. हुक्केरी) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी संजू हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर यापूर्वी अनेक गुन्हे आहेत. यातच त्याने दुचाकी चोरी सुरू केली होती. त्याने मौजमस्तीसाठी परराज्यातून तसेच कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमधून दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून बजाज, होंडासह विविध कंपन्यांच्या 8 दुचाकी होत्या. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक बी. के. पाटील, कॉन्स्टेबल जी. बी. नागन्नवर, पी. के. किळ्ळीकेतर यांनी ही कारवाई केली.