

बेळगाव : चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन कर्जदारांकडून अवैध वसुली केल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयित सावकाराला संकेश्वर पोलिसांनी बुधवारी (दि. २२) अटक केली. सदानंद भीमराव हलगे (वय ४७, रा. भीमानगर, संकेश्वर, ता. हुक्केरी) असे त्याचे नाव आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत स्नेहा विकास मेलगेरी (रा. करजगा, ता. हुक्केरी) यांनी सोमवारी (दि. २०) संकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार २०२२ ते २०२६ या कालावधीत त्यांनी व त्यांच्या पतीने संशयिताकडून व्याजावर कर्ज घेतले होते. कर्ज देताना संशयिताने तक्रारदाराच्या नावाने चार कोरे धनादेश तसेच जामीनपत्र घेतले होते. त्यापैकी तीन धनादेश नंतर परत करण्यात आले.
घेतलेल्या सुमारे १६ लाख १६ हजार ५८० रुपयांच्या कर्जापोटी तब्बल ३६ लाख ७७ हजार ६०७ रुपये मुद्दल व व्याजासह फोनपे आणि आरटीजीएसद्वारे परतफेड केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. एवढी रक्कम परत करुनही संशयिताने आणखी ४ लाख ६४ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून त्रास दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता.
त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत फरार संशयिताचा शोध घेतला. संशयित कणगला गाव परिसरातून दुसरीकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जिल्हा पोलिसप्रमुखांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.