

बेळगाव : वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सीमाप्रश्नी एसआयआर (मतदार यादी पुनरावलोकन) मोहिमेचे अर्ज मराठीतून दिलेले नाहीत. याविरोधात आता न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीने केला आहे.
मराठा मंदिर सभागृहाच्या कार्यालयात रविवारी (दि. २६) अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक झाली. या बैठकीत मराठीतून एसआयआर अर्ज प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत, त्यावर चर्चा करण्यात आली.
मरगाळे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांपासून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोगाशी मराठीतून अर्ज व इतर कागदपत्रे देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात निवेदन दिलेले आहे. तरीही मराठीतून अर्ज देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ॲड. महेश बिर्जे हा दावा दाखल करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मराठी माणसांना मराठीतून निवडणुकीची कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे. आता वारंवार मागणी करुनही आम्हाला मराठी अर्ज देण्यात आलेले नाहीत. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी न्यायालयात जावे लागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, मालोजी अष्टेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.