

बेळगाव : शेतजमिनीच्या एनए ले-आऊटचे काम होत नसल्याने वैतागलेल्या एकाने प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विषप्राशन केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. रुद्रय्या अम्मीनभावी (वय ५०, रा. राणेबेन्नूर, जि. हावेरी) असे त्यांचे नाव असून ते अत्यवस्थ बनले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रुद्रय्या यांना त्यांची शेतजमीन एनए करून घ्यायची आहे. यासाठी त्यांनी हावेरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे. अर्ज देऊन अनेक महिने लोटले तरी त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. त्यांना फक्त हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शेतजमिनीचे भू-परिवर्तन होईपर्यंत काहीही करता येत नाही. तुम्ही प्रादेशिक आयुक्त कार्यालयात जाऊन भेटा, असे सांगितले. त्यामुळे, ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रादेशिक आयुक्तालयाचेही हेलपाटे मारत होते.
गुरुवारी ते पुन्हा प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आले होते. प्रादेशिक आयुक्त जानकी एम. यांची भेट घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील अधिकाऱ्यांनी त्या नसल्याचे सांगताच ते पुन्हा अस्वस्थ झाले. सोबत आणलेले विष त्यांनी प्राशन केले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.