

बेळगाव : शहरातील रामतीर्थनगर परिसरात संशयास्पद स्थितीत उभारलेली सुमारे २० लाख रुपये किंमतीची आलिशान कार माळमारूती पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या कारचा वापर कोण करत होते तसेच ती नेमकी कुठून आणण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि.२६ रोजी रात्री रामतीर्थनगर परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांचे लक्ष या आलिशान कारकडे गेले. बराच वेळ एकाच ठिकाणी कार उभी असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासणीदरम्यान वाहनावरील नोंदणी क्रमांक तामिळनाडू राज्यातील असल्याचे दिसून आले. त्यानंतर वाहनाची कागदपत्रे आणि संबंधित माहितीची पडताळणी करण्यात आली असता अनेक बाबींमध्ये तफावत आढळून आली आहे.
संबंधित कार चोरीची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार कोणाच्या मालकीचे आहे, त्याचा वापर कोण करत होते आणि त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, संशयास्पद वाहनांविषयी सतर्कता दाखवत पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त आणि तपास मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.