

निपाणी : अनेक दशकांपासून प्रलंबित आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बेळगाव-कोल्हापूर थेट रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास अखेर प्रारंभ झाला आहे. सुमारे ५८ किमी लांबीचा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पार्कन्हट्टी आणि संकेश्वरमार्गे जाणार असून या प्रकल्पामुळे सीमाभागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक पथकाने पाहणी, मोजणी आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पुण्यातील मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेडकडे हे सर्वेक्षण सोपवण्यात आले असून सुमारे ५५ लाख रुपये खर्चातून हे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी ड्रोन, जीपीएससह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
सध्या बेळगाव ते कोल्हापूर प्रवासासाठी नागरिकांना मिरजमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढतो. प्रस्तावित थेट रेल्वे मार्ग सुरू झाल्यास दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
या रेल्वे मार्गामुळे धारवाड, कित्तूर, बेळगाव, संकेश्वर आणि कोल्हापूर ही महत्त्वाची शहरे रेल्वे जाळ्याशी अधिक जवळून जोडली जाणार आहेत. मार्ग कोणत्या गावांतून आणि शेतजमिनींतून जाणार याची नोंद घेतली जात असून डोंगर, नद्या, ओढे यासह पूल आणि बोगद्यांच्या नियोजनाचे कामही सुरू आहे. नव्या रेल्वे स्थानकांच्या उभारणीबाबतही प्राथमिक चाचपणी केली जात आहे.
रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास कोल्हापूरची व्यापारी बाजारपेठ, वस्त्रोद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच अंबाबाई मंदिरासह सीमाभागातील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि सीमाभागातील नागरिक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत. हा मार्ग अस्तित्वात आल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.