

बेळगाव : सराफी दुकानात दागिने दाखवण्यास सांगून ते घेऊन पळणाऱ्या संशयिताला दुकान मालकाने पाठलाग करून पकडले. तो चोरी करत असल्याचे आढळल्याने बघ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला खडेबाजार पोलसांच्या हवाली केले. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गणपत गल्लीत हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद झाली नव्हती.
गणपत गल्लीत प्रताप संपत पाटील यांच्या मालकीचे पाटील ॲण्ड ब्रदर्स गोल्ड शॉप आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या दुकानात अंदाजे तिशीचा एक तरुण दुकानात आला. त्याने आपल्याला दागिने खरेदी करायचे आहेत, असे सांगत दुकान मालकाला दागिने दाखवण्यास सांगितले. दागिने दाखवत असताना ताे नजर चुकवत ४ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा घेऊन पळून जाऊ लागला.
यावेळी प्रसंगावधान दाखवत दुकानातील काहीजण त्याच्या मागे पळाले. काही अंतरावर जाऊन त्याला ताब्यात घेतले. तो चोरी करत असल्याचे दिसून आल्याने त्याला बघ्यांनी चांगलाच चोप दिला. यानंतर ही माहिती खडेबाजार पोलिसांना कळवली. खडेबाजारचे निरीक्षक महांतेश धामण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित संशयिताला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत तो त्याचे नाव व गाव व्यवस्थित सांगत नव्हता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे खडेबाजार पोलिसांनी सांगितले.