

बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात तब्बल 21 गुन्हे दाखल असलेल्या आंतरराज्य गुन्हेगारावर गुंडा कायदा लागू केला. त्याला अटक करुन हिंडलगा कारागृहात पाठवल्याचे पत्रक पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिले आहे. विनायक ऊर्फ विल्लक शंकर प्रधान (वय 30, रा. महाद्वार रोड) असे त्याचे नाव आहे.
गेली 27 वर्षे विनायक हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे. 1999 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे, खुनाचा प्रयत्न, पैशासाठी अपहरण, रस्त्यात अडवून दरोडा टाकण्याबरोबरच हल्ला करणे, बेकायदेशीररित्या जमाव जमवून कायदा हाती घेणे, धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल, असे वागणे, खंडणी मागणे, शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे असे तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे त्याच्यावर बेळगावसह कर्नाटकातील अन्य पोलिस ठाणी, गोवा व महाराष्ट्रातही दाखल आहेत.
मार्केट पोलिस ठाण्याकडून त्याच्याविरोधात राऊडी शीट ओपन करुन व एमओबी फाईल तयार करुनही त्याच्या वागण्यात बदल झालेला नाही. तो सध्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला बेळगाव जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले होते. तरीही तो या आदेशाचे उल्लंघन करुन पुन्हा बेळगावात येऊन एकाचे पैशासाठी अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांपैकी दहा प्रकरणांमध्ये न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यात तो साक्षीदार व अन्य काहींना धमकी देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याच्यामुळे शांतता भंग होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी त्याला अटक करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार मार्केट पोलिसांनी त्याला करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.