

बेळगाव : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पाणीपुरवठा मंडळ व एलॲण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २५) राकसकोप जलाशयाची संयुक्त पाहणी केली. जलाशयाच्या पाणीपातळी सातत्याने घट होत चालल्याने पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन यावेळी ठरविण्यात आले.
पावसाने दडी मारल्याने आणि दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत चालल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या मृतसाठ्यातून पाणीउपसा सुरु आहे. पावसाने वेळेत हजेरी लावली नाही तर जूनमध्येच पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, एलॲण्डटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जलाशयाची पाहणी केली.
शहराचा पाणीपुरवठा राकसकोप व हिडकल जलाशयावर अवलंबून आहे. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावल्याने दोन्ही जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २,४४६ फुटावर आली आहे. मृतसाठ्यातील पाणीसाठा दोन फुटाने घटला आहे. मोटारींच्या साहाय्याने रोज २० ते २५ एमएलडी पाणीउपसा सुरु आहे. अजून दोन मोटारी पाणी खेचण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास या मोटारीही राकसकोप जलाशयात सोडण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी जलवाहिन्याही टाकून ठेवण्यात आल्या आहेत.
हिडकल जलाशयाची पाणीपातळी पाच टीएमसीवर आली असून शेती व औद्योगिक वसाहतीत होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. येथून रोज ५५ एमएलडी पाणी उपसा होत आहे. सद्या उपलब्ध असलेला पाणीसाठी कशा प्रकारे पुरवून वापरावा याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे, भविष्यात पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.