Belgaum News : अवजड वाहनांची रहदारी सुरूच
बेळगाव : शहरातील अवजड वाहनांची रहदारी साऱ्यांचीच डोकेदुखी ठरू लागले आहे. या अवजड वाहनांनी अनेकांचा बळी घेतला आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस रोडवर अवजड एका युवकाला चिरडले होते. त्यानंतर जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी अवजड वाहन वाहतुकीवर निर्बंध घालावेत अशी मागणी करण्यात आली. मात्र अद्याप याबाबत पोलिसांनी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे राजरोसपणे शहरातून अवजड वाहतूक होत आहे.
काँग्रेस रोडवर अंगावर शहारे येणारा अपघात घडला. अवजड वाहनाने युवकाला चिरडल्याने त्याच्या देहाा चेंदामेंदा झाला होता. त्यानंतर जनतेतून अवजड वाहनावर निर्बंध घालावेत, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत विविध संघटनानी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देऊन वाहनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी निश्चित पाऊल उचलू असे आश्वासन दिले होते. मात्र आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावर अवजड वाहतुकीची वर्दळ सुरूच आहे. उद्यमबाग, टिळकवाडी, काँग्रेस रोड, कॅम्प, कॉलेज रोड , कित्तूर चन्नम्मा, केएलई रोडवरून अतिअवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल व सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक शहराच्या बाहेरील रस्त्यावरून वळवावी यासाठी पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन करावे अशी मागणी होत आहे.
केवळ दोनच दिवस निर्बंध, त्यानंतर मुभा उद्यमबाग, काँग्रेस रोड आणि कॅम्प येथे अपघात घडून वाहनधारकांचा बळी गेलो. अपघातांनंतर दोन दिवसच वाहनांवर निर्बंध घातले जातात. मच्छे व पिरनवाडीजवळ वाहने थांबविण्यात येतात. नंतर टप्प्याटप्प्याने वाहने शहरातील मुख्य रस्त्यावरूनच सोडण्यात येत आहेत. त्यामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधचा काहीच उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यासाठी कठोर निर्णय घेऊन शहराच्या बाहेरूनच वाहने वळविल्यास शहरातील वाहतुकीवर ताण कमी होणार आहे.
महात्मा फुले रोड, शिवाजी उद्यानाजवळ वाहतूक कोंडी
शहापूर येथील महात्मा फुले रोड आणि शिवाजी उद्यानाजवळील रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. शिवाजी उद्यानला लागून असलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने. जुन्या एसपीएम रोडकडे ये-जा करत आहेत. त्यामुळे उद्यानाजवळ वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा त्या रस्त्यावरील वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्याची गरज निर्माण झाली आहे.

