

बेळगाव : महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने लोकसहभागातून रस्त्याकडेचा ब्लॅक स्पॉट हटवून त्याठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामात त्यांनी महापालिकेचा एकही रुपये वापरला नसल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आनंद पिपरे यांनी जुना पी. बी. रोड नाल्याशेजारी वर्षानुवर्षे असलेला ब्लॅक स्पॉट हटविण्याचा निर्धार केला होता. यासाठी महापालिकेच्या निधीचा वापर न करता लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार परिसरात जागृती आणि आवाहन केले. त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून आता कचऱ्याच्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभे राहत आहे.
नाल्याशेजारी परिसरातील लोक कचरा टाकत होते. हॉटेल व इतर कचऱ्यामुळे परिसराला गलिच्छ स्वरुप आले होते. त्याठिकाणी कितीही वेळा स्वच्छता मोहिम राबविली तरी पुन्हा कचरा साचत होता. त्यामुळे, पिपरे यांनी परिसरातील लोकांत जाऊन जागृती सुरु केली. याठिकाणी कचरा टाकू नये, तिथे आपण व्हर्टिकल गार्डन उभे करुया, असे पटवून दिले. त्याला लोकांचा प्रतिसाद लाभला. त्यानुसार लोकांनी स्वतःहून या कामात हातभार लावला. विटा, वाळू, सिमेंटची मदत केली. त्यामुळे, जिथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते, त्याठिकाणी आता सुंदर असे व्हर्टिकल गार्डन उभे राहणार आहे.
असा आहे उपक्रम
उपक्रमांतर्गत 50 फूट लांब आणि अडीच फूट रुंद व्हर्टिकल गार्डन उभे राहणार आहे. त्यात बांबू हाऊस उभारण्यात येणार असून कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत जागृती असणार आहे. याशिवाय लॉन उभारण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 हजार खर्च करण्यात आले असून सुमारे एक लाख रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.