बेळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर एका मृताची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. अरभावी-घटप्रभा रस्त्यावर शिंगळापूरजवळ पहाटे हा अपघात घडला.
दुरदुंडेश्वर अप्पया यतीनमठ (वय ४८) आणि गंगाधर बसप्पागौडी (वय २१, दोघेही रा. शिंगळापूर, ता. गोकाक ) अशी मृतांची नावे आहेत. दुरदुंडेश्वर यांची पत्नी मंजुळा गंभीर जखमी आहेत. हे दांपत्य मोटार सायकलवरून शिंगळापूरहून अरभावीकडे जात होते. समोरून गंगाधर दुसऱ्या दुचाकीवरून येत होते.
दोन्ही वाहनांची भरधाव समोरासमोर धडक झाली. त्यात गंगाधर याचा जागीच मृत्यू झाला. दुरदुंडेश्वर यांना डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने गोकाक सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंजुळा यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे.