Voter List | पाच लाख मतदार ‘आऊट’

बेळगाव जिल्ह्याची मतदार यादी प्रकाशित; आक्षेप नोंदविण्यासाठी महिनाभर मुदत
Voter List |
Voter List | पाच लाख मतदार ‘आऊट’
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ५ लाखांवर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष पुनरीक्षण मोहिमेद्वारे (एसआयआर) ही प्रक्रिया करण्यात आली असून, पात्र मतदारांची नावे वगळली गेली असल्यास त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यातून एकूण ५,१३,४३९ मतदार वगळण्यात आल आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मतदार यादी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ४१ लाख ७ हजार मतदार होते. एसआयआर प्रक्रियेनंतर आता प्रारूप यादीत ३५ लाख ९३ हजार ५६१ मतदारांची नावे आहेत. यामध्ये १८ लाख ५ हजार ६८५ पुरुष, तर १७ लाख ८७ हजार ७१५ महिला असून, तृतीयपंथी मतदारांची संख्या १६१ आहे. तसेच, ५ लाख १३ हजार ४३९ मतदार हे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार किंवा इतर श्रेणीतील आहेत.

ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत, ते मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ किंवा मतदार सेवा पोर्टलद्वारे फॉर्म-६ भरून आपली नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदारही अर्ज करण्यास पात्र आहेत. मतदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मसुदा यादी तपासण्याची आणि काही दावे किंवा आक्षेप असल्यास २४ ऑगस्टपासून २३ सप्टेंबरपर्यंत ते सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्यांचे मॅपिंग (भौगोलिक सीमांकन) झालेले नाही, अशा मतदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावर मतदारांच्या नोटिशीबाबत चौकशी करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असेही ते म्हणाले.

मतदान केंद्रसंख्या वाढली

मतदान केंद्रांच्या पडताळणीनंतर जिल्ह्यात ११९ नवीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या ४,६४४ झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. १,२०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे विभाजन करून नवीन मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच, काही इमारतींची ठिकाणे आणि नावे बदलण्यात आली आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग आणि निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news