

बेनाडी : शिवापूरवाडी (ता. निपाणी) येथे प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची नव्याने संघाची स्थापना करून संस्थेला पतमंजुरी देण्यात आली आहे. गावातील कोणताही शेतकरी जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या शून्य टक्के व्याजदराच्या कर्जापासून वंचित राहू नये, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी केले.
शिवापूरवाडीत महेशानंद महास्वामी यांच्या सानिध्यात धुळोबा विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाच्या कर्जवितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अण्णासाहेब जोल्ले पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी, पाईपलाईन उभारणी व इतर कारणांसाठी १२ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. बँकेच्या माध्यमातून ४० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. पतक्षमतेनुसार विविध कारणांसाठी अतिरिक्त कर्जसुविधाही उपलब्ध होणार आहेत.
आ. शशिकला जोल्ले यांनी, मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सुमारे ८०० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. दुसऱ्या कार्यकाळात कोरोनामुळे विकासकामांच्या गतीवर परिणाम झाला. मतदारसंघात ३०० हून अधिक वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. अंगणवाडींसाठीही दर्जेदार इमारती उभारण्यात आल्या आहेत. परिसरातील विविध मंदिरांना मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धुळोबा विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघास २१ लाख २० हजार रुपयांची पतमंजुरी देण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. निवृत्त सैनिक बाळासाहेब खोत, साताप्पा खोत, महेशानंद महास्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष पोपट खोत यांनी प्रास्ताविकात आता गावातच सर्व बँक व्यवहार उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली असल्याचे सांगितले. पतमंजुरी झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष गांधी खोत, उपाध्यक्ष पोपट खोत, संचालक रमेश खोत, सुभाष खोत, प्रकाश खोत, मालुताई खोत, अश्विनी जोमा, जावेद जमादार, निशिकांत जाधव, जिल्हा बँकेचे नियंत्रक पी. डी. नवले, महिला ग्रामीण भाजप अध्यक्षा लक्ष्मी खोत, श्रीकांत कणगले, हालशुगरचे संचालक, सभासद व नागरिक उपस्थित होते.