

बेळगाव : महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे. उदयकुमार तळवार यांनी बेकायदेशीररित्या दहा दिवसांत अनेक पीआयडी मंजूर केले आहेत, असा आरोप नगरसेवकांनी करताच या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश आयुक्त कार्तिक एम. यांनी महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांना दिला.
महापालिकेत बुधवारी (दि. १३) सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नगरसेवक रवी धोत्रे यांनी प्रतिनियुक्तीवर आलेले आणि आता बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा विषय उपस्थित केला. प्रशासन उपायुक्त म्हणून नियुक्तीनंतर तळवार यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी दहा दिवसांत आयुक्त, महसूल उपायुक्त यांना विश्वासात न घेता परस्पर की तयार करून घेऊन बेकायदा पीआयडी मंजूर केली आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.
त्यावर आयुक्त कार्तिक यांनी या प्रकरणी चौकशी करुन अहवाल देण्याच्या सूचना महसूल उपायुक्त हुल्लोळी यांना केल्या. सभेला आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी अनुपस्थिती राहिले. त्यामुळे विरोधी गटाने आणि सत्ताधारी गटानेही संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
सभेत महापौरांनी महिला आरक्षणाला काँग्रेसने विरोध केला म्हणून त्यांचा निषेध असा ठराव मांडला. त्यावेळी नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी याच सभागृहात २०२३ मध्ये महिला आरक्षण संमत झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अभिनंदनाचा ठराव समंत करण्यात आला. महिला आरक्षण संमत झाले असेल तर आता निषेधाचा ठराव का करण्यात येतोय, असा सवाल केला. त्यावर नगरसेवक श्रेयस नाकाडी यांनी भाजपची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसने या आरक्षणाला विरोध केलाच नाही, असे सांगितले. त्यामुळे, सभागृहात गोंधळ झाला. दोन्ही बाजुंनी घोषणाबाजी झाली. त्यामुळे गदारोळात महापौरांनी सभागृह तहकूब केले.