

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सोमवारपासून मान्सूनने हजेरी लावली आहे. शुक्रवारीही सकाळी व संध्याकाळी पावसाच्या सरी आल्या. मात्र दुपारी पावसाने उसंत घेतली होती. पावसामुळे शहरात सखल भागात पाणीच पाणी झाले होते. क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पावसाने तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पिरनवाडीजवळ बेळगाव -खानापूर रोडवरून पाणी वाहत होते. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांना पाण्यातूनच वाहने हाकावी लागली. अशीच परिस्थिती गांधीनगर येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली निर्माण झाली आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने ते तुंबले होते. सोमवारपर्यंत अशाच सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.