

बेळगाव : उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याच्या संशयावरून मंगळवारी पहाटे बेळगाव जिल्हा नगर विकास कक्षाचे सहायक कार्यकारी अभियंता अजयसिंग राजपूत यांच्यावर लोकायुक्त छापा टाकण्यात आला. अंजनेयनगर येथे एकाला लागून एक असलेली सलग तीन घरे, तेथून काहीच अंतरावरील दोन घरे तसेच अथणी आणि हुक्केरी येथील घरांवर एकाचवेळी हा छापा टाकण्यात आला. यामध्ये त्यांच्याकडे स्थावर व जंगम अशी 3 कोटी 78 लाखांची मालमत्ता आढळून आली आहे.
लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक भरतकुमार रेड्डी, उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक निरंजन पाटील व अन्य सहकाऱ्यांनी हे छापे टाकले. पहाटे साडेपाचच्या सुमारास अंजनेयनगर येथील पाच घरांमध्ये तसेच अथणी व हुक्केरी येथे लोकायुक्त पोलिसांनी प्रवेश करत कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. शहरात अजयसिंग यांच्या मालकीची चार घरे असून, एका घरात ते स्वतः राहतात तर अन्य तीन घरे भाडोत्री दिलेली आहेत.
पाचही घरांतील मालमत्तेची कागदपत्रे, दागिने, वाहने व बँकेतील ठेवींच्या कागदपत्रांची मोजदाद पहाटेपासूनच सुरू होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मोजदाद पूर्ण झाल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी अधिकृत माहिती जाहीर केली. अजयसिंग यांंच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक सापडलेल्या मालमत्तेची एकूण किंमत पावणेचार कोटी होत असल्याचे दिसून येते.
अजयसिंग यांच्याकडे सापडलेल्या एकूण मालमत्तेची किंमत 5 कोटी 30 लाख इतकी होते. पैकी उत्पन्नाचे स्त्रोत वगळून उर्वरित मालमत्ता त्यांनी गैरमार्गाने कमावलेली आहे, असे गृहित धरले जाते. उत्पन्नाचे स्त्रोत ग्राह्य मानून मोजदाद केलेली मालमत्ता 1 कोटी 52 लाखांची आहे. अथणी व हुक्केरी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर असल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे उर्वरित 3 कोटी 78 लाखांची मालमत्ता त्यांनी बेकायदेशीररीत्या कमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रितसर चौकशी होऊन आरोपपत्र दाखल केले जाईल, असे लोकायुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभियंत्याकडे जादा सापडलेले घबाड
7 भूखंड : 60 लाख
3 घरे : 1 कोटी 97 लाख
शेती 12 एकर : 10 लाख
रोख रक्कम : 6 लाख 22 हजार
सोने 498 ग्रॅम : 48 लाख
चांदी 3 किलो : 6 लाख 30 हजार
वाहने, कार, दुचाकी : 19 लाख
मुदत ठेवी : 23 लाख
एकूण मालमत्ता : 3 कोटी 78 लाख