Belgaum Fraud : चिट फंड अपहार; चौघांवर गुन्हा

गुन्हा दाखल झालेले एकाच कुटुंबातील; वार्षिक चौदा टक्के व्याजाचे आमिष
Belgaum Fraud
चिट फंड अपहारFile Photo
Published on
Updated on

बेळगाव ः आपल्याकडे मुदत ठेव ठेवल्यास त्यावर 14 टक्के व्याज व चिट फंडात गुंतवण्यासाठी रक्कम दिल्यास त्यावर 10 टक्के व्याज देण्याचे आमिष विजयनगर, हिंडलगा येथील नाईक कुटुंबाने दाखवले. परंतु, वर्ष उलटले तरी रक्कम दिली नसल्याचे सांगत गुंतवणूकदारांनी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार एकाच कुटुंबातील चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. हा अपहार तीन कोटींचा असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये दिलीप खाचू नाईक, पत्नी गीता दिलीप नाईक, मुलगा दर्शन दिलीप नाईक व त्याची पत्नी प्रांजल दर्शन नाईक (सर्वजण रा. विजयनगर, हिंडलगा) यांचा समावेश आहे. या प्रकरणी लष्करात आचारी असलेले यश विद्याधर चौगुले (वय 29, रा. जयनगर, हिंडलगा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपरोक्त संशयितांनी विजयनगरमध्ये श्री गणेश मासिक वार्षिक चीटफंड नावाने फंड गुंतवणूक सुुरू केली. आपल्या चीट फंडात कुणी मुदत ठेव ठेवली तर त्यावर 100 रुपयाला वार्षिक 14 रुपये व्याज देऊ. तसेच चीटफंडात ठेवण्यासाठी कुणी रक्कम दिल्यास त्यावर 100 रुपयांना 10 रुपये व्याज देऊ, अशी जाहिरातबाजी केली. त्याला भुलून फिर्यादी यश यांनी 10 जानेवारी 2023 रोजी चीटफंडात 50 हजारची रक्कम मुदतठेव म्हणून गुंतवली. याशिवाय चीटफंडात तीन खाती उघडत त्यावर 54 हजाराची रक्कमही गुंतवली. परंतु, याला दोन वर्षे उलटली तरी आपली रक्कम परत दिली जात नसल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

तीन कोटींची गुंतवणूक

फिर्याद जरी यश चौगले यांनी दिली असली तरी फसलेले अनेकजण असल्याचा संशय आहे. कारण विजयनगर, हिंडलगा, विनायकनगरसह या परिसरात राहणाऱ्या शेकडो जणांकडून त्यांनी फंडात रक्कम गुंतवून घेतली आहे. ही रक्कम सुमारे 3 कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे. त्यामुळे, उपरोक्त चौघा संशयितांनी रक्कम गुंतवून घेऊन फसवणूक व विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कॅम्प पोलिसांनी नोंद करून घेतली असून निरीक्षक आनंद वणकुद्रे पुढील तपास करीत आहेत.

तक्रारीचे आवाहन

या परिसरातील असंख्य लोकांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. परंतु, सध्यातरी फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी कॅम्प पोलिस ठाण्याशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news