Karnataka Politics: बेळगाव जिल्ह्यात मंत्रिपदासाठी चुरस; लक्ष्मण सवदी आघाडीवर?

राज्यातील मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या हालचालींना वेग आल्याने बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे
Karnataka Politics: बेळगाव जिल्ह्यात मंत्रिपदासाठी चुरस; लक्ष्मण सवदी आघाडीवर?
Published on
Updated on

अथणी : राज्यातील मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या हालचालींना वेग आल्याने बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याने सर्वांचे लक्ष आता पक्ष नेतृत्वाकडे लागले आहे.

बेळगाव जिल्ह्यातून अथणीचे आ. लक्ष्मण सवदी, बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, रामदुर्गचे आ. अशोक पट्टण तसेच इतर काही वरिष्ठ नेत्यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर लॉबिंगलाही सुरुवात झाल्याची चर्चा आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लक्ष्मण सवदी यांना योग्य मान-सन्मान व जबाबदारी देण्याचे आश्वासन पक्ष नेतृत्वाने दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेत त्यांना स्थान द्यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांत प्रचार करून काँग्रेस उमेदवारांच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. राज्यातील तेली समाजाचे प्रमुख नेते म्हणूनही सवदी यांचे नाव घेतले जाते. भाजपमध्ये असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद मिळाले नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गत सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याही मंत्रिपदासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. रामदुर्गचे आ. अशोक पट्टण हेही पक्षातील वरिष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. शिवाय चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. प्रकाश हुक्केरी यांचेही नाव चर्चेत आहे. दीर्घकाळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने यावेळी त्यांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील विविध गट आणि समाजघटकांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. मंत्रिपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news