

बेळगाव : पूर्ववैमनस्यातून केलेल्या हल्ल्यात सहा दिवसांपूर्वी जखमी झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिकांचा मृत्यू झाला असून, खुनाच्या आरोपाखाली हल्लेखोर युवकाला अटक झाली आहे. रिअल इस्टेटच्या वादातून हा खून झाल्याचे सांगितले जात असले, तरी मृत व्यावसायिक आणि हल्लेखोर युवक यांच्यात पूर्ववैमनस्य होते, असे समजते.
फजल महंमद डफेदार (वय 56, रा. वीरभद्रनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अयान महंमदअरिफ नायकोडी (वय 26, रा. खंजर गल्ली) या तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. 13 एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी फजल डफेदार हे दरबार गल्लीतल बेकरीसमोर थांबले होते. अयानने पाठीमागून येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये त्यांच्या डोकीला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.
खुनी हल्ला; आता खुनाचा गुन्हा
खुनी हल्ल्यानंतर डफेदार यांच्या समर्थनार्थ मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तातडीने मार्केट पोलिसांनी अयानला अटक करून त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता; परंतु जखमी डफेदार यांचा मृत्यू झाल्याने अयानवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली. हल्ल्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अयानने आपल्याला डफेदार यांच्यावर आधीपासून राग होता, असे सांगितले आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची तपास करीत आहेत.