

बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे स्थलांतर अखेर पूर्ण झाले असून, क्लब रोडवरील जुन्या इमारतीतून हा विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील नव्या अत्याधुनिक आणि प्रशस्त इमारतीत गेल्या दोन दिवसापासून सुरू करण्यात आला आहे. नव्या इमारतीत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक उपकरणे आणि उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांना अधिक जलद आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
अपघातग्रस्त, सर्पदंश झालेले रुग्ण, मारहाणीत गंभीर जखमी झालेले, उंचावरून पडलेले तसेच अन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांवर आता नव्या आपत्कालीन विभागात उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन आरोग्यसेवेला आधुनिकतेची जोड मिळाली आहे.
मात्र, नव्या इमारतीत सेवा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या ये-जा संदर्भात काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. इमारतीसमोरील रस्ता तुलनेने अरुंद असल्याने एकाचवेळी अनेक रुग्णवाहिका आल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीमुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार केंद्रात पोहोचविण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते, अशीही चर्चा आहे.
चारहून अधिक दशकांच्या आठवणींना विराम
क्लब रोडवरील आपत्कालीन विभाग गेली चारहून अधिक दशके जिल्ह्यातील लाखो रुग्णांसाठी आधारवड ठरला होता. दिवस-रात्र गजबजलेला हा विभाग अनेक गंभीर रुग्णांना जीवनदान देणारा ठरला. असंख्य डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांनी या इमारतीत सेवा बजावत अनेक वर्षे रुग्णसेवा केली. अनेक कर्मचारी याच विभागातून निवृत्त झाले. त्यामुळे नव्या इमारतीत काम सुरू झाले असले तरी जुन्या विभागाच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. आता जुन्या आपत्कालीन विभागात शांतता पसरली असून वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे या इमारतीकडे पाहताना अनेक कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होत आहेत.