

बेळगाव : अमननगरमध्ये तलवार हल्ला झाल्यानंतर सुस्त बनलेले अँटी स्टॅबिंग स्क्वॉड पुन्हा सक्रिय झाले आहे. बुधवारी (दि. ६) रात्री शहरातील सर्व ठाणा हद्दीत थांबून वाहने, तरुणांच्या बॅगा व अन्य साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यात दोघा तरुणांकडे तलवार व चाकू आढळून आला. ही धारदार शस्त्रे जप्त करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षुल्लक कारणातून अमननगरमध्ये तलवार हल्ला झाला. यामध्ये सहाजण जखमी झाले. या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करुन सहाजणांना अटकही केली. परंतु, पुन्हा घरात लपवून ठेवलेली तलवार, चाकू, जांबिया अशी धारदार शस्त्रे बाहेर येऊ लागल्याने पोलिस खाते सतर्क बनले आहे.
सहा महिन्यांपूर्वी सीबीटीवरुन जाताना एका तरुणावर चाकूहल्ला झाला होता. त्यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याला अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची स्थापना करण्याचे आदेश बजावले होते. ठाण्यातील उपनिरीक्षक व त्यांच्या समवेत आणखी दोघे कॉन्स्टेबल ठिकठिकाणी थांबून दुचाकी व चारचाकी वाहनांची डिक्की, संशयास्पदरित्या बॅगा घेऊन जाणाऱ्यांची तपासणी करण्यात येत होती.
विविध बंदोबस्त व घडामोडींमुळे गेल्या दोन महिन्यांपासून अँटी स्टॅबिंग स्क्वॉड सुस्तावले होते. परंतु, अमननगर हल्ल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहे. बुधवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शहरातील खडेबाजार, मार्केट, माळमारुती, कॅम्प, उद्यमबाग, शहापूर, टिळकवाडीसह सर्व पोलिस ठाणा हद्दीतील निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कॉन्स्टेबल थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.