Belgaum News: जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

जि. पं. सीईओ राहुल शिंदे : ३१६६९ क्विंटल बियाणाचे वाटप, २.८७ लाख टन खताचा पुरवठा
Belgaum News: जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण
Published on
Updated on

बेळगाव : जिल्ह्यातील ७.५२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ७.१६ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पेरणी झाली आहे. आतापर्यंत ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.

येथील कृषी खात्याच्या सहसंचालक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.४) आयोजित २०२६-२७ या वर्षासाठीच्या अंमलबजावणी खात्याच्या विविध प्रकल्पांच्या जिल्हास्तरीय देखरेख समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पावसाळी हंगामात ३७,५४३ क्विंटल बियाणांची मागणी होती. त्यापैकी ३७,२६७ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत ३१,६६९ क्विंटलचे वितरण झाले आहे. सध्या, विविध बियाणांचा ५,५९८ क्विंटल साठा उपलब्ध असून कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे.

सर्व योजनांची अंमलबजावणी

सीईओ राहुल शिंदे यांनी कृषी खात्याच्या आत्मा, कृषी भाग्य, हाय-टेक हार्वेस्टर हब, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय नैसर्गिक अभियान, कर्नाटक रयत समृद्धी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया, पीक विविधता, कडधान्यांमध्ये आत्मनिर्भरता, व्हीबी-जी रामजी योजना यासारख्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

२.८७ लाख टन खत पुरवठा

कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले की, मान्सून हंगामात ३५४ मिमी पावसाची अपेक्षा होती. परंतु, ३४१ मिमी पाऊस झाला आहे. पावसाची ४ टक्के तूट आहे. मान्सून हंगामासाठी आवश्यक असलेल्या २५०७३६ टन खतापैकी जिल्ह्याला आतापर्यंत २८७३७० टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. १५२७७६ टन विविध खते राखीव ठेवण्यात आली असून १३४५९४ टन खत उपलब्ध आहेत. ८४०८ टन युरिया आणि १२६५ टन डीएपी खताचा साठा आहे.

५६,०४०३ शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञ जिल्हाभर सातत्याने विभागीय दौरे करत असून पीक संरक्षण मोहीम, कीटकनाशकांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती मोहीम आणि पर्यायी पीक योजनांबाबत शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. गेल्यावर्षी जिल्हाभरात विविध प्रशिक्षण, संदेश, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून ५६,०४०३ शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली, असे त्‍यांनी सांगितले.

राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियान

सीईओ शिंदे म्हणाले, राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियानामुळे जमिनीची सुपीकता सुधारण्यास आणि लागवडीचा खर्च कमी करण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढले आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ७०४८ शेतकऱ्यांना माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, १२ क्लस्टर्समध्ये इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून योग्यप्रकारे अंमलबजावणी करावी, असे सांगण्यात आले.

रेशीम उद्योग, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग, वन विभाग आणि इतर योजनांतर्गत शासकीय कार्यक्रमांची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सभेत वर्ष २०२६-२७ साठीच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेच्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news