

खानापूर : गाडीकोप (ता. खानापूर) गावच्या हद्दीत खानापूर-एम. के. हुबळी रस्त्यालगत दगडाने ठेचून बलोग्याच्या शेतकर्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मारेकरी रुद्राप्पा शिवपुत्रप्पा होसट्टी (वय 30, रा. बिडी, ता. खानापूर) या ट्रक चालकाला अवघ्या 24 तासात पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. डोक्यात दगड घालून शिवनगौडा इरनगौडा पाटील (47) रा. बलोगा या शेतकर्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर तपास हाती घेण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात बिडी येथील ट्रक चालक रुद्राप्पा होसट्टी याने शिवनगौडा याला आपल्यासोबत बोलावून नेले. शिवारात जेवण व दारू पाजून शिवनगौडा याचा खून केल्याचे संशयित रुद्राप्पाने कबूल केले आहे. तो गुलबर्गा येथे लपला असल्याची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक बिरादार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी संशयिताला ताब्यात घेतले. सायंकाळी त्याला खानापूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलिस कोठडी दिली असून याप्रकरणी पोलिस अधिक शोध घेत आहेत.