Bangalore Mumbai Express: बंगळूर-मुंबई एक्स्प्रेसला प्रारंभ

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आभासी पद्धतीने हिरवा झेंडा
Bangalore Mumbai Express: बंगळूर-मुंबई एक्स्प्रेसला प्रारंभ
Published on
Updated on

बंगळूर : बहुचर्चित बंगळूर-मुंबई एक्स्प्रेसला अखेर प्रारंभ झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (दि. १७) एक्स्प्रेसचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले. बंगळूर स्थानकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ झाली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

उद्‌घाटनानंतर मंत्री वैष्णव म्हणाले, २०१४ पासून कर्नाटकात सुमारे १,७५० किलोमीटर लांबीच्या नवीन लोहमार्गांची उभारणी करण्यात आली आहे. हासन-मंगळूर लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या तिथे चाचण्या सुरू आहेत. बंगळूर आणि मुंबई दरम्यान 'वंदे भारत स्लीपर' सेवेची सुरुवात लवकरच होईल. सध्या कर्नाटकात १२ 'वंदे भारत' धावत आहेत. बंगळूर-मंगळूर मार्गावर सध्या चाचण्या सुरू असून लवकरच मडगावपर्यंतच्या किनारपट्टी भागातील संपर्क व्यवस्था सुलभ होईल. मुंबई, बंगळूर आणि इतर प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून या रेल्वे जाळ्याचा विस्तार होऊन ते ७,००० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री सोमण्णा यांनी बंगळूर-मुंबई एक्स्प्रेससह नवीन बंगळूर-मुंबई रेल्वेला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले. ते आपल्या भाषणात म्हणाले, सध्या कर्नाटकात १२ वंदे भारत धावत असून त्या १४ जिल्ह्यांना जोडतात. आता २७० कोटी रुपयांच्या खर्चाने वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या देखभालीसाठी एक डेपो उभारला जाईल. तसेच बंगळूरमध्ये ५२.७३ कोटी रुपयांच्या खर्चाने 'चेअर कार' गाड्यांच्या देखभालीची सुविधा केली जाईल.

कर्नाटकला रेल्वे अर्थसंकल्पात ७,७४८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे. राज्यातील ३,८४० किलोमीटर लांबीच्या लोहमार्गांचा विकास केला असून ३,७४२ कि.मी. मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले. राज्य १०० टक्के विद्युतीकरणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. उद्‌घाटनप्रसंगी खासदार पी. सी. मोहन, तेजस्वी सूर्या, जी. सी. चंद्रशेखर, लहरसिंग सिरोया, जग्गेश, नारायणा कोरगप्पा, आमदार एस. रघू, पुट्टण्णा, एच. एस. गोपीनाथ, रामाजी गौडा, बंगळूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोषकुमार सिंह यांच्यासह नैऋत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news